बुधवार, ५ जून, २०१९

पाऊस

#बरसात_के_दिन_आयेगे...

घामाच्या धारांनी चिंब चिंब भिजलेल्या तनामनाला मनोमन यथोचित भिजवणाऱ्या उनाड,खोडकर,बालिश आणि अश्या बऱ्याच उक्तींनी रंगलेल्या पावसाचे वेध लागले असतील. तो केव्हा,कित्ती,कसा येईल त्याचा मुक्काम कित्ती दिवसांचा असेल यांचे अंदाज एव्हाना हवामान खात्याने वर्तविलेला असेलही.
   भारतासारख्या कृषिप्रधान देशातील लोकांना पावसाचे महत्व अधिक हे वेगळे सांगायला नको. आपलं भविष्य पावसावर अवलंबून असल्याने तो आपल्याला कथा,कविता,गाणी,चित्रपट अन पुस्तकांच्या पानापानातून सतत भेटत असतो.
   काही काही झोपळू जीवांना पावसाळा त्यातल्यात्यात उन्हाळा आवडत नसतो. हिवाळ्यात कसलीच कटकट नसते ना ऊन लागतं ना चिखलाचे पिचपीच. मस्तपैकी भरपेट खा अन ब्लँकेट घेऊन डोळे भरून झोपा. पण पाऊस आवडणारे ही मोजकेच असतात अस्मादिकांसारखे.
   रिमझिम पावसात आपल्या मनाच्या राणीस बाईकच्या मागे बसवून येथेच्छ भिजत लॉंग ड्राईव्ह वर जाऊन टपरी वरचा आलं गवतीचहा मिश्रित वाफाळता चहा, खमखमीत भज्जी,वडा यांची मज्जा ब्लँकेट घेऊन उबदारपणे जोपणाऱ्या कुंभकर्णना अनुभवता येत नाही. पावसाळ्यात हिरवा शालू परिधान केलेली वनराई, उमललेली नाना तर्हेची अन रंगाची फुलं, विविध रंगाची पिसं असलेली फुलपाखरं आपल्या फुलपाखरासोबत याचि डोळा पाहण्याची मौज काय वर्णावी.
   ह्या ऋतुने कितीतरी कलाकारांना त्यांची कला उस्फूर्तपणे सादर करण्यास प्रोत्साहित केले ह्याची जर का नोंद घेतली तर टिपटीप बरसा पाणी ह्या गाण्यावर नखशिखांत ओलीचिंब होऊन नाचणाऱ्या रविना टंडन पासून  "मेघदूत" लिहणाऱ्या कवी कालिदास,"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालिचे" अशा पाऊस कविता लिहणाऱ्या बालकवी "त्रंबक बापूजी ठोंबरे" पर्यंत अशी बरीचशी नावं आपल्याला सापडतील.
   पावसाळा बऱ्याच कवींना कविता लिहण्यास भाग पाडतोच पण ती लिहलेली कविता जगण्यास ही दिलासा देतो. पाऊस कधी लेखक कवी लोकांना बाप म्हणून भेटतो तर कधी त्यात त्यांना प्रेमळ मायाळू आई ही गवसते. तर कधी हवीहवीशी वाटणारी प्रियसी सुद्धा.
   पहिला पाऊस बच्चेकंपनी ला गच्चीवर बोलवतो अन त्यांना नाचवतो पहिल्या पावसाने आपल्यातील हरवलेलं बालिश मुल ही डोकावत. पण वय आड आल्याने आपण त्या बलिशपणाला मुरड घालून जगण्यातलं एक सुंदर पान गमावून बसतो. कसलीही अन कुणाचीही पर्वा न करता डोक्यावर पडणाऱ्या पाऊसधारात जो नाचतो तोच खऱ्या अर्थाने पावसाची मज्जा उपभोगतो. नाहीतर खिडकीच्या बाहेर तळहातावर इवलुस तळं साचावण्यात तो आनंद मिळत नाही.
   आपल्याला म्हणजे तुमच्या माझ्या सारख्या सामान्यजनांना पाऊस जरी वेगवेगळ्या रंगारुपात भेटत असला. तरी त्याची खरी ओढ व गरज साऱ्या जगाची पोटाची खळगी भरणाऱ्या बळीराज्यास अधिक असते. त्याच्याही रानावनात शेतात हा पाऊससखा बरसतो. अन डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूथेंबांना मोतीयाचे रूप देतो.
    प्रामुख्याने नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासून मिळणार पाऊस आपल्या जगण्याची दशा अन दिशा ठरवत असतो. इतकेच नाही तर साऱ्या हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती ह्या वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसावर अवलंबून असते. ह्या बरसणाऱ्या पावसावर तापमान, हवेचा दाब, त्यामुळे बदलणारी हवेची दिशा ह्या मूलभूत बदलांचा पाऊस सक्रिय होण्यास अथवा त्यास विलंब होण्यास मुख्य सहभाग असतो.
   पाऊस हा प्रत्येकाला वेगळा दिसतो. तो वेगळा भासतो. प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो. कधी तो आल्हाददायक असतो, तर कधी तो रौद्र रूप धारण करतो. कुण्या एकेकाळी हाच सखा इतक्या गडगडाटासह बरसायचा की आम्हा बच्चेकंपनीला आई, आजी त्या गडगडट्याची भीती घालून निजवीत असतं. कधी दुपारी इतक्या घामाच्या धारा लागायच्या की तेव्हाच उमजून जायचं की आता तो येईल. आणि तो यायचाही वाऱ्या वादळावर स्वार होऊन विजेचा लखलखाट करत ओसंडायचा पाऊस आपल्या अंगणात,रानात अन मनातही....त्याच्या येण्याआधी त्याच्या येण्याचा निरोप घेऊन य्यायची त्याची प्रियसी तिच्या पाऊसओल्या वासानेच मन ओतप्रोत भरून येई. मग तो मातकट वास आपण आपल्या दोन्ही नाकपुड्या डोळे मिटून पित असू. आताआताशी तो दुर्मिळ मातीचा सुवास लोप पावत चाललाय की काय कुणास ठाऊक. बरं तो सुवास कुठल्याही अत्तरवाल्या चाचू,भाईजान कडे मिळत नाही म्हणून तो खरेदीही करून ठेवता येत नाही. तो निसर्गाच्या, झाडांच्या फॅक्टरीतच बनविला जात असतो. अन आपण आपल्या सुखसोयीसाठी जंगल च्या जंगल नष्ट करत चाललोय. कदाचित आपल्या पुढील पिढ्याना ह्या पाऊस ओल्या मातीचा सुवास डोळे मिटून नाकपुड्या ओढून हुंगण्याची संधी मिळणार नाही.
   प्रियजनहो अजून ही हातातून वेळ गेलीय असं म्हणता येणार नाही. आपल्या देशाला खास पावसाळा हा चार महिन्यांचा ऋतू निसर्गाने बहाल केला आहे. तो त्याच्या मुक्तहस्ताने आपल्या पर्यंत येतोही आपण त्याचे योग्य नियोजन केले. जंगलतोड थांबवून जंगलवृक्षसंवर्धन केले तर काळवंडत चालली आपली धरणी माता परत एकदा सुजलाम सुफलाम होईल अन्यथा आपण झाडांवर कुऱ्हाड चालवत नसून भविष्यात येणाऱ्या आपल्याच मानव प्रजातीच्या अन ओघानेच चराचर सृष्टीच्या पायी कुऱ्हाड चालवत जाऊ ह्याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी लागेल.

✍️श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा