बुधवार, ५ जून, २०१९

(नर्स) परिचारिका

सकाळी लोकलच्या चाकरमान्यांच्या गर्दीत
ती सामावत जाते रोज होऊन भाग गर्दीचा
झुंजूमुंजू पहाटेच गोड स्वप्न पाहत आपण
निवांत झोपून असतो घरी तिचा नवराही
ती पळत राहते रुग्णसेवेच व्रत घेऊन
पायाला चाक लावल्यागत आणि घेत
असते काळजी साऱ्यांची कुणी आवाज
देतं सिस्टर सलाईन संपली कुणी
म्हणतं ताप आलाय तर कुणी
डोकेदुखीची तक्रार घेऊन समोर
उभा राहतो डोकं गच्चं दाबून
दोन्ही हातांनी ती त्याचीही
काळजी घेत देते गोळी पॅरासिटामॉलची
अन पळत राहते त्या सलाईन संपलेल्या
बाबा, आजोबा, काकांकडे त्यांचीही
ती विचारपूस करते पाहते ताप
अन रक्तदाबही स्वतःचा किंचितही
वाढू न देता अन चेहऱ्यावरील हसू
थोडंही ढळू न देता...ह्या साऱ्या
धावपळीत ती तिचे दोन घासही विसरते
तेवढ्यात जगताला वेळ दावणाऱ्या
घडाळ्यात वाजतात दुपारचे दोन
शिफ्ट बदलते ती घरी जाते परत
नवी ऊर्जा घेऊन परत सेवा करण्यासाठी
इतकी सारी करून  धावाधाव  दिसत
नाही कुणास तिच्या पांढऱ्या गणवेशातील
साध्वी, परी, आई अन नारीही.......

श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा