गुरुवार, ६ जून, २०१९

रात्र

अशी व्हावी भेट तिची अन माझी
कातरवेळी सांजपावलांनी धरावी
वाट त्या अवखळ क्षणांची
अन घ्यावी ऊरभेट तनामनांनी

घट्ट मिटल्या त्या बालमुठीतून ओघळत जावेत जसे गोड क्षण...अगदी तसंच ओसांडून जातंय आयुष्य त्या काळाच्या वज्रमुठीतून.......प्रत्येक क्षण मृत्यूरूपी सत्याकडे घेऊन जातोय....आणि आपण आहोत की.......आपल्याच व्यस्त जीवनात त्या क्षणाची दखल देखील घेत नाही......ती अजून त्याच रम्य स्वप्नविश्वात विरघळली रात्र अन अजून त्या रात्र पाहरेकर्यांचे "जागते रहो" चे बोल कानी पडत आहेत.....पण अजून तो काही त्या धुंद स्वप्नातून जागा होत नाही.....कसलीशी मादकधुंदी त्याच्या अणूरेणुत पुरेपूर पसरलीय की जिच्यातून बाहेर येण्यास तो धजावत नाहीये......तो जर का असाच अजून काहीवेळ त्या धुंदीच्या बाहुपाशात गुरफटून राहिला तर त्याचे जगणं कदाचित कठीण होईल हे तो ही जाणतो आणि ती रात्र ही..... असेच त्याच्या आयुष्यातील विस्तवाचे अन वास्तवाचे धगधगते निखारे तो फुंकर घातल जपेल अन तेवत ठेवेल त्या हृदयमंदिरातील दिवा जो कैक दिवसापासून त्याला लखलख उजळतो......ते त्याच्या मनातील तिचे अन त्याचेही भावविश्व अजून तसेच राहील त्याच्या मनी त्या तलम वस्रागत ज्याने दिलीय त्याला ऊब अन जगण्याची नवी दिशा.....पण......."पण"........नावाच्या दुःखर्या जखमेवर त्याला जालीम औषधी मिळाली तर...... ती त्याला मिळेल कदाचित त्या गल्लीबोळात जिथं त्याची ती राहत होती.....तिथेही मिळेल त्याला ती दवा जिथं त्यांची भेट होतं होती.....मिळेल ते औषध पुस्तकांच्या अन वृक्षवल्लीच्या पानाफुलातून......अन निराशेच्या काळोखाला चिरत जाणाऱ्या काळ्याच अक्षरातूनही पुस्तकांच्या.........आता अशीच भेट होईल त्याची तिच्याशी गोड स्वप्नं पाहण्यास जेव्हा मिटतील त्याच्या चक्षूंवरच्या दोन पाकळ्या उद्या फिरून कधीच न उघडण्यासाठी..... 😔

✍श्रीकांत पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा